नेमकी घटना काय?
बीड तालुक्यातील निंबाळवी गावातील ही घटना आहे. प्राजक्ता उर्फ राधा रामेश्वर दराडे (वय २४) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. प्राजक्ताने आपला साडेतीन वर्षांचा मुलगा वेदांत याच्यासह ३१ डिसेंबर २०२५ रोजी गावातील विहिरीत उडी घेतली होती. या दुर्घटनेत माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला. वर्षाच्या अखेरीस घडलेल्या या घटनेमुळे निंबाळवी गावावर शोककळा पसरली होती.
advertisement
सुरुवातीला या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, आत्महत्येमागचे कारण समोर आले. प्राजक्ताला नवीन मोबाईल हवा होता, मात्र पतीने तो घेऊन दिला नाही. याच कारणावरून पती-पत्नीत वाद झाला होता. याच रागाच्या भरात प्राजक्ताने टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात स्पष्ट झाले.
मयत मातेवरच खुनाचा गुन्हा
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, स्वतःसोबतच एका निरागस चिमुरड्याचा जीव घेतल्याने पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पती रामेश्वर दराडे यांच्या फिर्यादीवरून, स्वतःच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी मयत प्राजक्ता दराडे विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज करत आहेत.
