प्रियांका गांधी यांनी करवीरनगरी कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेला काँग्रेस नेते सतेज पाटील, खासदार छत्रपती शाहू महाराज, मालोजीराजे तसेच महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार उपस्थित होते.
प्रियांका गांधी म्हणाल्या, महायुती सरकार केवळ बोलणाऱ्यांचे आहे, असे वाटते. काम करणाऱ्याच्या नावाने यांची बोंब आहे. महिलांसाठी पाच वर्षात काम केले नाही. निवडणुकीच्या शेवटच्या काही महिन्यात आर्थिक लाभाची योजना आणली आणि खूप काही काम केले, असे दाखवले. शेतकऱ्यांच्या हितासाठी यांनी काही निर्णय घेतले नाही. शिवरायांचा पुतळा संसदेबाहेर काढला आणि इकडे त्यांच्या नावाने राजकारण करतायेत. महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलतात पण त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी भाजपच्या राजकारणाचा समाचार घेतला.
advertisement
प्रियांका गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे पुरोगामित्व अधोरेखित केले. महाराष्ट्रात आल्यावर खरोखर वाटते की ही क्रांतीची भूमी आहे. शाहू-फुले आंबेडकरांची भूमी आहे.या भूमीच्या कणाकणात समानता, मानवता आहे. राघोजी भांगरे, तंट्या भिल्ल यांच्यासारखे क्रांतीकारक इथेच घडले. महाराष्ट्राची धरती ही कधीच धार्मिक कट्टरतेला प्रोत्साहन देत नाही. इथली भूमीच्या कणाकणात समानता आहे. संत तुकाराम म्हणायचे, जे का रंजले गांजले, ज्यासी म्हणे जो आपुले. तोची साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा... गावागावात मंदिरात जाऊन झाडू मारणारे आणि प्रेम करायला शिकविणारे, सत्याच्या वाटेवर चालायला लावणारे संत गाडगेबाबा, टिळक-काका कालेलकर-गोखले, भाऊसाहेब थोरात यांच्यासारख्या क्रांतीकारकांनी इथेच स्वातंत्र्याची लढाई लढली, या सगळ्यांना मी सादर प्रमाण करते, असे प्रियांका म्हणाल्या.