विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भाजपच्या केंद्रातील शीर्षस्थ नेत्यांच्या सभा आटोपल्याने काँग्रेसने रणनीती आखून शेवटच्या टप्प्यात अधिक जोमाने प्रचार करण्यासाठी प्रमुख नेत्यांना मैदानात उतरवले आहे. प्रियांका गांधी कालपासून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सभा घेत आहेत. शिर्डी, कोल्हापूरनंतर रविवारी प्रियांका गांधी यांची सभा आरएसएसचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये होती. तत्पूर्वी रोड शोमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी घुसून राडा केल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
advertisement
भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी, प्रियांकांना झेंडे दाखवले
रॅलीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भारत माता की जय... वंदे मातरम अशा घोषणांनी भाजप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. तसेच त्यांनी भाजप उमेदवारांचे पोस्टरही झळकावले. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात हा सगळा प्रकार घडला.
प्रियांका गांधी जर निवडणूक प्रचाराला आल्या असत्या, तर आमची काहीच हरकत नव्हती. परंतु केवळ संघाचे मुख्यालय आहे म्हणून त्या याठिकाणी आल्या आहेत. त्यांना आम्हाला उसकवण्यासाठी आणण्यात आलंय, पण आमचे सगळे कार्यकर्ते आणि इथली जनता प्रवीण दटके यांच्याबाजूने आहे. त्यामुळे त्यांच्या रॅलीचा काही एक फरक पडणार नाही, असे भाजपच्या समर्थकांनी गोंधळानंतर न्यूज १८ लोकमतशी बोलताना सांगितले.