गणपतीसाठी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून लाखो चाकरमानी कोकणातील आपल्या गावी जाणार आहेत. एसटी व खासगी बस मुंबई-गोवा महामार्गाचा वापर करतील. याशिवाय खासगी वाहनं देखील याच मार्गाचा वापर करतील. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन 10 ते 11 तासाचा प्रवास 15 ते 20 तासांवर जाण्याची शक्यता आहे.
advertisement
वडखळ ते माणगावपर्यंत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे हा प्रवास अनेकांना नकोसा होऊ शकतो. यावर पर्याय म्हणून मुंबई-पुणे एक्सप्रेसवेने जाऊन पुढे पुणे-बेंगलोर महामार्गाने प्रवास केल्यास कोकणात सहज पोहचता येईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, मालवण, कुडाळ, कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील स्वत:चं वाहन असलेले चाकरमानी पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर, निपाणी मार्गे घरी जाऊ शकतात. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा व राजापूर तालुक्यातील गावांमध्ये जाण्यासाठीही कराड, मलकापूर, आंबा व अनुस्कुरा घाट सोयीचा ठरेल. या पर्यायी मार्गांचा वापर केल्यास मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीतूनही सुटका होईल.
पुणेमार्गे कोकणात जाण्यासाठी पर्याय
आंबा घाट: कराड येथून पाच किलोमीटरवर उजव्या बाजूला वळण घेऊन मलकापूर, आंबा घाट मार्गे पाली व पुढे मुंबई-गोवा महामार्गावर जाता येते.
अणुस्कुरा घाट: कराड येथून पाच किलोमीटरवर उजव्या बाजूला वळण घेऊन मलकापूर, अणुस्कुरा घाट पाचल व पुढे मुंबई-गोवा महामार्गावर जाता येते.
करूळ घाट: कराड कोल्हापूर शहर, रंकाळा, गगनबावडा करूळ घाट वैभववाडी मार्गे मुंबई-गोवा महामार्गावर जाता येते.
भुईबावडा घाट: कराड कोल्हापूर शहर, रंकाळा, गगनबावडा, भुईबावडा घाट, भुईबावडा, उंबर्डे, खारेपाटण मार्गे मुंबई-गोवा महामार्गावर जाता येते.
फोंडा घाट: कराड कोल्हापूर शहर, रंकाळा, राधानगरी, फोंडा घाट मार्गे फोंडा पुढे कणकवली गोवा महामार्गावर जाता येते.
आंबोली घाट: पुणे-बंगळुरु हायवे निपाणी येथे उजवे वळण घेऊन, आजरा, आंबोली, आंबोली घाट, माणगाव सावंतवाडी जाता येते. यामार्गे दाणोली, विलवडे, बांदा येथेही जाता येते.
