एका बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याच्या घरी अशाप्रकारे जबरी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिसांना देण्यात आली आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. आपली मनस्थिती ठीक झाल्यानंतर आपण तक्रार दाखल करू, अशी माहिती पूजा खेडकरने पोलिसांना दिली आहे. घरात चोरी झाल्याची माहिती देणाऱ्या पूजा खेडकर यांनी गुन्हा दाखल न केल्याने विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.
advertisement
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आयएएस पदावरून बडतर्फ करण्यात आलेल्या डॉक्टर पूजा खेडकरने त्यांच्या पुण्यातील घरी काल रात्री चोरीचा प्रकार घडला आहे. याबाबतची माहिती फोन करून चतुःश्रृंगी पोलीसांना देण्यात आली आहे. पुण्यातील बाणेर रस्त्यावर खेडकर कुटुंबाचा बंगला आहे. या बंगल्यात खेडकर कुटुंबासह काही नोकर राहतात. त्यातील एक नोकर आठच दिवसांपूर्वी नेपाळहून आला होता. त्या नोकराने काल रात्री गुंगीचे औषध देऊन दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केले आणि आपल्याला बांधून ठेवले. त्यानंतर तो चोर घरातील सर्वांचे मोबाईल घेऊन पसार झाला, असं पूजा खेडकरांचं म्हणणं आहे.
बांधून ठेवलेल्या अवस्थेत असलेल्या पूजा यांनी दाराच्या कडीचा उपयोग करुन स्वतःचे हात मोकळे केले आणि पोलीसांना फोन केला. त्यानंतर चतुःश्रृंगी पोलीसांच पथक खेडकर यांच्या घरी पोहचले असता दिलीप आणि मनोरमा खेडकर हे बेशुद्धावस्थेत आढळून आले. पोलीसांनी तातडीने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
पूजा खेडकर यांनी स्वतः दुसऱ्या एका फोनवरून हा प्रकार पोलीसांना कळवला होता. मात्र त्यांनी अद्याप लेखी तक्रार पोलीसांकडे दिलेली नाही. आपली मनस्थिती व्यवस्थित झाली की आपण तक्रार देऊ असं तिनं पोलीसांना सांगितलंय. मोबाईलच्या व्यतिरिक्त घरातील आणखी कोणत्या वस्तू चोरी झाली आहे का? याचीही माहिती तिनं अद्याप पोलीसांना दिलेली नाही.
