नेमकं प्रकरण काय?
राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील रहिवासी असणारे दोन चुलत भाऊ आपल्य कुटुंबीयांसोबत शेतात खत टाकण्यासाठी गेले होते. दोघांचा ओढ्याच्या पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने गोगलगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
साहिल दत्तात्रय चौधरी (वय- 19) आणि किरण नारायण चौधरी (वय- 14) असं मृत पावलेल्या दोन भावंडांची नावं आहेत. घटनेच्या दिवशी हे दोघे चुलतभाऊ कुटुंबीयांसोबत शेतात खत टाकण्यासाठी गेले होते. खत टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर साहिल आणि किरण दोघंही हात-पाय धुण्यासाठी जवळच्या ओढ्यावर गेले. इथं दोघांचा पाय घसरून ते ओढ्याच्या पाण्यात पडले. दोघांनाही पोहता येत नव्हतं. त्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
advertisement
ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून दोघांना बाहेर काढले. त्यांना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. किरण हा नुकताच इयत्ता आठवीची परीक्षा पास झाला होता. तर साहिल लोणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकत होता. दोघांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गोगलगाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
