यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विदर्भावर भाजप-काँग्रेसने आपले लक्ष केंद्रीत केले आहेत. विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या आघाड्यांनी विदर्भातून अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच अनुषंगाने विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा बुलढाण्यातील चिखलीमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी विमानात बिघाड झाल्याने राहुल गांधी यांना पुन्हा दिल्लीत माघारी फिरावे लागले. त्यामुळे राहुल गांधी यांची सभा रद्द झाली. सभा रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आहे.
advertisement
राहुल गांधी यांनी काय म्हटले?
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आहे. राहुल गांधी यांनी म्हटले की, मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मला आज चिखलीला यायचे होते. तिथे मला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भेटायचे होते आणि जाहीर सभेला संबोधित करायचे होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमान येऊ शकले नाही.
त्यांनी पुढे म्हटले की, मला माहीत आहे की महाराष्ट्रातील शेतकरी खूप अडचणींचा सामना करत आहेत. भाजप सरकार सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव देत नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, 'इंडिया' आघाडीचे सरकार तुमची काळजी घेईल आणि तुमच्या समस्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करेल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.
