परभणी रेल्वे स्थानकाबाहेर १० डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची विटंबना केल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पोलिसांनी अटक केलेल्या ५० जणांपैकी मृत सोमनाथ सूर्यवंशी एक होता. पोलिसांनी अटक केलेल्या ३५ वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा रविवारी परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी नेतेमंडळी खवळून उठली आहेत. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू होत असेल तर यापेक्षा असह्य काय असू शकते, अशा तीव्र प्रतिक्रिया देऊन आरोपींविरोधात कठोर शासन करण्याची मागणी सर्वत्र जोर धरू लागलेली आहे. दोषी पोलिसांना देखील कठोर शिक्षेची मागणी समाजातून होत आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सोमवारी परभणीला भेट दिली.
advertisement
नेमके काय घडले?
राहुल गांधी यांनी सोमवारी दुपारी सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या व्यथा ऐकल्या तसेच कुटुंबियांचे सांत्वन केले. सुर्यवंशी कुटुंबियांचे म्हणणे ऐकून घेऊन संसदेत यावर आवाज उठविण्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिली. यावेळी सूर्यवंशी कुटुंबीय कमालीचे भावुक झाले होते. कायद्याचे शिक्षण घेणारा तरणाबांड सुशिक्षित पोरगा गेला, असे सांगत कुटुंबीय धाय मोकलून रडले. लोकसभा आणि विधानसभेत परभणी हिंसाचारावरून वातावरण पेटलेले असताना राहुल गांधी यांच्या दौऱ्याने परभणी पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे.
परभणी हिंसाचार प्रकरण
परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करुन सोमनाथ सूर्यवंशीसह ५० जणांना अटक केली होती. १० डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेनंतर झालेल्या आंदोलनात सोमनाथला १२ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आणि १४ डिसेंबर रोजी त्याला न्यायालयीन कोठडीत धाडण्यात आले. न्यायालयीन कोठडीत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने विविध पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
