नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मोठ्या फौजफाट्यासह निवडणूक आयोगाच्या पथकाने अनिल शिंदे यांच्या घरावर धाड टाकली. यावेळी घराची कसून झडती घेण्यात आली. अगदी किचनमधील सामानाचीही उलटपालट करण्यात आल्याची माहिती आहे. बराच वेळ चाललेल्या या कारवाईत प्रशासनाच्या हाती नेमकं काय लागलं, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही.
advertisement
मात्र या कारवाईनंतर अनिल शिंदे यांच्या पत्नी शीला शिंदे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. "केवळ मानसिक त्रास देण्यासाठी आणि निवडणुकीच्या प्रचारात अडथळा आणण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे," असे त्यांनी म्हटलं आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे अनिल शिंदे यांचा रक्तदाब (BP) वाढला आणि त्यांची प्रकृती बिघडली. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
शिवसेनेचा मित्रपक्षांवर निशाणा
अहिल्यानगर महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजीव भोर यांनी विरोधकांवर तोफ डागली. ते म्हणाले, "आमच्या उमेदवाराला मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधी पक्ष आणि महायुतीतील मित्रपक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सत्तेचा आणि प्रशासनाचा गैरवापर करून आमच्या उमेदवारांवर दबाव टाकला जात आहे. विशेष म्हणजे, अनिल शिंदेंच्या घरासमोरच दुसऱ्या एका उमेदवाराचे घर आहे, जिथे शेकडो लोकांची गर्दी असताना तिथे कोणतीही चौकशी झाली नाही. मात्र, जाणीवपूर्वक शिंदेंना लक्ष्य करण्यात आले."
