पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत थेट लढत होती.या लढतीत भाजपच्या पराग मेहता यांनी 15 पैकी 9 मते मिळवत आपला विजय संपादन केला आहे. तर शिंदे गटाच्या कल्याणी दबके यांना अवघी 5 मते मिळाली आहेत,त्यामुळे त्यांचा पराभव झाला आहे.
पाली नगरपंचायत मधील तत्कालीन नगराध्यक्ष यांचा सदस्यत्व रद्द करण्यात आला होता त्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली. त्यामुळे पाली नगरपंचायत मधील मित्रपक्षांचा हा लढा परिस्पर विरोधी कायम राहण्याची शक्यता आहे. निवडणुकीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
advertisement
या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी काम पाहिले. तसेच पाली नगरपंचायत मुख्याधिकारी माधुरी मडके व इतर पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.
आजतागायत पाली नगरपंचायत मध्ये असंख्य राजकीय उलथापालथ होत असून, अवघ्या साडेतीन वर्षांत चौथ्या नगराध्यक्षाची निवड झाली आहे. नगराध्यक्षपदावर सतत होणारे बदल, नगरसेवक व नगराध्यक्ष यांचे सदस्यत्व रद्द होणे, तसेच पहिल्या नगराध्यक्षांचा राजीनामा, नगरसेवक पदासाठी पोटनिवडणुक आदी घडामोडी हे सर्व पालीच्या विकासकामांसाठी घातक ठरले आहेत.
पक्षीय बलाबल
पाली नगरपंचायतीत एकूण 17 सदस्य असून 2 सदस्यांचे सदस्यत्व काही दिवसांपूर्वी रद्द झाले आहे.
सध्याची आकडेवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 5 नगरसेवक, शिवसेना (शिंदे गट) 5 नगरसेवक, भाजप 4 नगरसेवक आणि शेकाप 1 नगरसेवक अशी पक्षीय बलाबल आहे.
अपक्ष उमेदवार
पाली नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये पराग मेहता हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.