वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना रा राज ठाकरे यांनी म्हटले की, “यंदाची निवडणूक ही केवळ सत्ता मिळवण्यासाठीची नाही, तर आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. हे संकट ओळखा आणि कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवा,” असा स्पष्ट आणि आक्रमक संदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.
advertisement
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे अवघे दोन दिवस शिल्लक असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
सध्या विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असताना मनसेकडून मात्र अद्याप एकाही उमेदवाराचे नाव अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र मनसेने अंतर्गत पातळीवर उमेदवारांना थेट एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या धावपळीत राज ठाकरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर भर देत, “आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई जिंकायचीच आहे,” असा ठाम निर्धार व्यक्त केला.
“कुणाला किती जागा मिळाल्या, यावरून नाराज होऊ नका. मराठी माणसाच्या हितापुढे वैयक्तिक स्वार्थ क्षुल्लक आहे. मतभेद बाजूला ठेवा आणि मुंबई वाचवण्याची जबाबदारी ओळखा,” असे सांगत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना एकजुटीचा मंत्र दिला. काही शक्तींना मुंबई ताब्यात घ्यायची स्वप्नं पडत असल्याची टीका करत, “त्या स्वप्नांना गाडण्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, “आज भाजप नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जोरावर माज करत आहे. मात्र सत्तेविना राहण्याचे प्रसंग देशाने याआधीही पाहिले आहेत. भाजपमध्ये गेलं तर सगळं मिळेल, असा भ्रम अनेकांना आहे, पण तिथे टांगती तलवार आहे. ही सगळी बसवलेली माणसं आहेत.”
निवडणूक प्रचारादरम्यान अनेक गोष्टी उघड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. उमेदवारी अर्ज भरताना जल्लोष करा, युतीचा धर्म पाळा आणि शेवटपर्यंत लढा, असे आवाहन करत राज ठाकरे यांनी, “रात्र वैऱ्याची आहे. ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची लढाई असून, मुंबई कोणत्याही परिस्थितीत आपल्या हातात ठेवायची आहे,” असा ठाम विश्वास मनसैनिकांमध्ये निर्माण केला.
