मुंबई: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या घोषणेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आला असतानाच, मुंबईत मनसेला मोठा धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी जी भीती व्यक्त केली होती, ती भीती खरी ठरली असल्याचे चित्र आहे. राज ठाकरे यांचे जुने आणि विश्वासू सहकारी असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सचिव सुधाकर तांबोळी यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
advertisement
काल रात्री उशिरा मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात सुधाकर तांबोळी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची युती जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मनसेच्या वरिष्ठ नेत्याने पक्ष सोडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सुधाकर तांबोळी हे मनसेतील जुने आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेपासून ते राज ठाकरे यांच्यासोबत कार्यरत होते. विद्यार्थी चळवळीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास मनसेच्या स्थापनेनंतरही अखंड सुरू राहिला. मनसेकडून त्यांनी महाराष्ट्र सचिव म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.
विशेष म्हणजे, सुधाकर तांबोळी हे मनसेतर्फे सलग दोन टर्म सिनेट सदस्य म्हणून निवडून आले होते. संघटनात्मक कामासोबतच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने मनसेच्या संघटनात्मक रचनेला आणि विशेषतः मुंबईत काही प्रमाणात धक्का बसल्याचे मानले जात आहे.
राज ठाकरे–उद्धव ठाकरे युतीनंतर मनसेत अंतर्गत धुसफूस सुरू आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत असताना, दुसरीकडे वरिष्ठ नेत्यांच्या पक्षांतरामुळे राज ठाकरे यांच्यासमोर नव्या आव्हानांचे चित्र उभे राहिले आहे. येत्या काळात या घडामोडींचा मनसेवर नेमका काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
