शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात मराठी बहुल भागातील जागा वाटपाचा तिढा असल्याचे समोर आले होते. या भागातील मनसेचे माजी नगरसेवक आणि स्थानिक नेते, पदाधिकारी निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. मात्र, काही जागा ठाकरे गटाला सोडण्यात आल्याने मनसेमध्ये नाराजी होती. आता, या नाराजीचे पडसाद बंडखोरीत उमटू लागले आहे.
मराठीबहुल ओळखला जाणारा भांडुप परिसरातील वॉर्ड क्रमांक ११४ मधून मनसेच्या इच्छुक उमेदवार असलेल्या अनिशा माजगावकर या बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पक्षाकडून अद्याप अधिकृत उमेदवारी न जाहीर झाल्याने नाराज झालेल्या अनिशा माजगावकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
advertisement
सूत्रांच्या माहितीनुसार, अनिशा माजगावकर या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी वॉर्ड क्रमांक ११४ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या दीर्घकाळापासून मनसेत सक्रिय असून भांडुप परिसरात संघटनात्मक कामात त्यांचा सहभाग राहिला आहे. स्थानिक पातळीवर त्यांचा चांगला जनसंपर्क असून, त्यामुळेच त्या उमेदवारीसाठी इच्छुक होत्या.
दरम्यान, मनसेकडून उमेदवारांच्या यादीला विलंब होत असल्याने अनेक इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अनिशा माजगावकर यांनी स्वतंत्र मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यांना इतर काही राजकीय पक्षांकडूनही उमेदवारीसाठी विचारणा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र सध्या तरी त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे.
अनिशा माजगावकर यांच्या संभाव्य बंडखोरीमुळे भांडुपमधील मनसेच्या गणितावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्ष नेतृत्व या घडामोडीची दखल घेऊन त्यांना मनवण्याचा प्रयत्न करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेसमोर अंतर्गत नाराजीचा आणखी एक पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे.
