मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र आले होते. दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतरही मुंबई महापालिका निवडणुकीत सत्तेने हुलकावणी दिली. मनसेचे ६ नगरसेवक विजयी झाले. ठाकरे गटाने अपेक्षित मदत केली नसल्याचा सूर मनसे पदाधिकाऱ्यांनी लावला होता. तर, राज यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले होते.
आज सकाळच्या सुमारास भाजप नेते प्रसाद लाड हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले होते. प्रसाद लाड यांनी आपल्या चिरंजीवांच्या विवाह सोहळ्याचे आमंत्रण राज यांना दिले. त्यानंतर राज यांनी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
advertisement
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुमारे अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. ही भेट 'सदिच्छा भेट' असल्याचे सांगण्यात येत असले तरी, चर्चेचा मुख्य विषय आगामी राजकीय समीकरणे असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बदलेले पक्षीय बलाबल आणि भविष्यातील रणनीती यावर या दोन नेत्यांमध्ये खलबतं झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
'नंदनवन'वर विविध विषयांवर चर्चा
या भेटीदरम्यान केवळ राजकीयच नव्हे, तर मुंबईतील विकासकामे, नागरी समस्या आणि इतर सामाजिक विषयांवरही या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. महापालिका निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी संवाद साधल्याने महायुती आणि मनसे यांच्यातील जवळीक अधिक वाढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
