ठाकरे बंधूंमध्ये बहुतांशी जागा वाटप पूर्ण झाल्यानंतर युतीची घोषणा करण्यात आल्याचे म्हटले जात होते. स्थानिक पातळीवर काही जागांवर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आग्रही आहेत. जागा वाटपाचा पेच कायम असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे, आज मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाच्या सगळ्या शाखा प्रमुखांना शिवसेना भवनात बोलावण्यात आले आहे. या बैठकीत विभाग प्रमुखांसह आमदार-खासदारांनाही बोलावण्यात आले आहे.
advertisement
ठाकरे गटाने बैठकांचा धडाका लावल्यानंतर आता मनसेने देखील आपल्या गोटात हालचालींना वेग आणला आहे. मनसेच्या मुंबई पदाधिकाऱ्यांचा तातडीने मेळावा बोलावण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
सोमवारी, २९ डिसेंबर रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात मनसेचे मुंबईतील सर्व नेते, सरचिटणीस, सचिव, उपाध्यक्ष, महिला-पुरुष विभाग अध्यक्ष, विभाग सचिव, महिला-पुरुष उपविभाग अध्यक्ष, उपविभाग सचिव,महिला-पुरुष शाखा अध्यक्ष, शाखा सचिव व उपशाखा अध्यक्ष तसेच मुंबईतीलच सर्व विद्यार्थी सेना राज्य कार्यकारिणी,अंगिकृत संघटनांचे विभाग अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांना बोलावण्यात आले आहे.
राज ठाकरे काय बोलणार?
सकाळी ९.३० वाजता हा मेळावा पार पडणार असल्याने राज ठाकरे मनसैनिकांना कोणता आदेश देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेषतः मुंबईतील जागांबाबत कोण कुठून लढणार, यावर ठाकरे बंधूंमध्ये आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अर्ज भरण्याची मुदत संपण्यापूर्वीच्या काही तास आधीच राज ठाकरेंनी मेळावा बोलावला आहे. त्यामुळे मनसेकडून प्रचाराचा नारळ फुटण्यासोबत उमेदवारही जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात स्थानिक पातळीवरील अधिक समन्वयासाठी देखील काही सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे.
