अशीच एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे, जिथे एका हताश शेतकऱ्याने आपल्या दोन एकर जमिनीतील बहरलेली द्राक्ष बाग रडत-रडत कुऱ्हाडीने तोडून टाकली. बाग जोमात वाढली, पण लाखो रुपयांच्या गुंतवणुकीनंतरही फळच आले नाही. त्यामुळे कर्ज आणि नैराश्याच्या ओझ्याखाली दबलेल्या या बागायतदाराला नाईलाजाने हा कठोर आणि जीवघेणा निर्णय घ्यावा लागला आहे.
advertisement
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मतकुणकी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी रामचंद्र जाधव यांनी द्राक्ष बागेला माल नाही. ती फेल गेल्यामुळे तसेच लहरी निसर्ग, रोगराई, कर्जबाजारीपणा आणि होणारे आर्थिक नुकसान याला कंटाळून दोन एकर द्राक्ष बाग काढून टाकली.
सरकारने द्राक्ष उत्पादकांना कर्जमाफी देऊन द्राक्ष बागा जगविण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी होत आहे. कोरोना काळापासून द्राक्ष बागायतदारांना फायदा कमी नुकसान जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे.चालू हंगामात दोन एकर बागेची फळ छाटणी घेतली.चांगला माल येईल अशी अपेक्षा ठेवून खते,औषधे,मजुरी यासाठी लाखो रुपये खर्च केले होते.
मात्र अपेक्षाभंग झाला.बागेला मालच आला नाही.उन्हाळ्यात काडी तयार होण्यास पुरेसा कालावधी मिळाला नसल्याने बाग फेल गेल्याचे जाणकार सांगतात. लहरी निसर्ग,वातावरणातील बदल , महागाई, फसवणूक, वाढलेले औषधाचे भाव,आवाक्याबाहेर असलेले मजुरीचे दर, वाढता उत्पादन खर्च या कारणामुळे द्राक्ष शेती तोट्यात जात आहे.
प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत होते. बागेसाठी काढलेले कर्ज भरणे सुद्धा मुश्किल झाले आहे. बागेला मालच नसल्यामुळे पुढील काळात ती सांभाळणे अशक्य होते.त्यासाठी आवश्यक खर्च करणे शक्य नव्हते.कर्जाचा बोजा वाढतच होता.अखेर बाग काढून टाकण्याचा निर्णय घेतला. शासनाचे तत्काळ याची दखल घेऊन कर्जमाफी द्यावी. अन्यथा द्राक्ष शेती उध्वस्त होईल.
