सातारा : गंभीर आजारपणाच्या काळात उपचारासाठी पैशांची चिंता नको, या उद्देशाने केंद्र सरकारने ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार खासगी रुग्णालयांमध्ये मिळण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले आयुष्मान कार्ड काढताना येणाऱ्या अडचणींमुळे अनेक नागरिक निराश होताना दिसत आहेत.
advertisement
सध्या आयुष्मान कार्ड काढण्याची प्रक्रिया आयुष्मान महा ई-सेवा केंद्रांमार्फत केली जाते. मात्र, या केंद्रांवर कार्ड काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पहिल्याच टप्प्यावर अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. रेशनिंग मिळते का, हा पहिला प्रश्न विचारला जात असून, रेशनकार्डधारकांनाच आयुष्मान कार्ड मिळेल, अशी भूमिका अनेक ठिकाणी घेतली जात आहे. त्यामुळे रेशनकार्ड नसलेले किंवा रेशनिंग प्रक्रियेत अडचणीत असलेले नागरिक थेट योजनेपासून वंचित राहत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे अनेक नागरिकांकडे वैध रेशनकार्ड असूनही त्यांचे आयुष्मान कार्ड तयार होत नाही. तांत्रिक अडचणी, ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी, नावातील स्पेलिंगचा फरक, आधार किंवा इतर कागदपत्रांमधील विसंगती यामुळे अर्ज फेटाळले जात आहेत. परिणामी, प्रत्यक्षात पात्र असतानाही अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना या महत्त्वाकांक्षी आरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही.
ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांसाठी खासगी रुग्णालयांमधील उपचारांचा खर्च उचलणे अत्यंत कठीण आहे. अशा परिस्थितीत आयुष्मान योजनेचा आधार हा जीवनदायी ठरू शकतो. मात्र, आजारपणाच्या वेळी कार्डच उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे शासनाच्या योजनेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आयुष्मान कार्ड काढण्यासाठी महा ई-सेवा केंद्रात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. “रेशनिंग मिळत नसेल तर कार्ड मिळणार नाही,” असे सरळ सांगितले जात असल्याने अनेकजण निराश होऊन परत जात आहेत. त्यामुळे सर्व रेशनकार्डधारकांना सरसकट ऑनलाइन बारा अंकी क्रमांक देण्यात यावा, तसेच या प्रक्रियेसाठी पुरवठा विभाग व तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
12 अंकी नंबर गरजेचा
दरम्यान, एखादा रुग्ण तातडीने रुग्णालयात दाखल झाल्यानंतर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या व्यवस्थापनाकडून काही प्रमाणात तातडीची मदत केली जात आहे. अशा वेळी संबंधित रुग्णाच्या रेशनकार्डवर बारा अंकी ऑनलाइन क्रमांक तहसीलदारांकडून घेण्याची प्रक्रिया राबवली जाते, जेणेकरून रुग्णाला आयुष्मान योजनेचा लाभ मिळू शकेल.
