खेड शहरातील निवाचा तळ भागात असलेल्या प्रसिद्ध ऋषभ ज्वेलर्समध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे.दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या चार महिलांच्या टोळीने सोन्याचे मंगळसूत्र हातचलाखीने लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर महिलांनी ज्वेलर्समधून पळ काढला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलांनी दागिन्यांची खरेदी करण्याचे कारण सांगून दागिने पाहायला सुरुवात केली. त्यातील एका महिलेने सोन्याचे मंगळसूत्र मणी पाहायला घेतले आणि ते हातात ठेवून सरळ दुकानातून पळ काढला.त्या महिलेचे पाठोपाठ तिच्यासोबत आलेल्या अन्य तीन महिलांनी देखील पळ काढला होता. ही संपूर्ण घटना दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
advertisement
दरम्यान दागिने पाहताना एका महिलेने 2.5 ते 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (25-30 हजार रुपये किंमत) हातात घेतले होते. हाच दागिना घेऊन तिने पळ काढल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासाची चक्रे फिरवली आहेत.
याआधीही खेड-दापोली परिसरात महिलांकडूनच अशा चोरीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.दोन दिवसांपूर्वी खेड रेल्वे स्थानक परिसरात रिक्षात बसण्याच्या गडबडीत एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास करण्यात आली होती.या घटनांवरून महिलांचीच चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान खेड पोलिसांनि सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने महिलांचा शोध घ्यायला सूरूवात केली आहे. त्यासोबत व्यापाऱ्यांना व मौल्यवान वस्तूंची विक्री करणाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
