कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील हालचालींना वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास ही भेट शिंदे यांच्या ‘शुभदीप’ निवासस्थानी पार पडली. या भेटीत प्रामुख्याने कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेतील युतीच्या जागावाटपावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे, आजच भाजप आणि शिवसेनेची उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
कल्याण-डोंबिवलीतील जागांबाबत तोडगा काय?
सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीसाठी काही जागांवर शिक्कामोर्तब झाले आहे. कल्याण–डोंबिवलीत जवळपास १० ते १५ वॉर्डांमध्ये शिवसेना आणि भाजप परस्पर संमतीने मैत्रीपूर्ण लढत देणार असल्याची चर्चा आहे.
गेल्या एका आठवड्यात रविंद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्बल तीन वेळा भेट घेतली आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटप आणि रणनीती अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळत आहेत.
या महापालिकांबाबतही चर्चा...
या भेटीत केवळ कल्याण–डोंबिवलीपुरतीच चर्चा मर्यादित नव्हती, तर ठाणे, उल्हासनगर आणि पनवेल महानगरपालिकांबाबतही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच नवी मुंबईतील महायुतीबाबतची चर्चा देखील अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं सांगितलं जात आहे.
या घडामोडींमुळे महायुतीच्या राजकीय समीकरणांना लवकरच स्पष्ट दिशा मिळण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागा वाटपावरून आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार असून भाजप नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे.
