अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे: शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख, माजी आमदार रविंद्र धंगेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर धंगेकरांनी थेट जमीन घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर भाजपच्या तक्रारीवर शिवसेना शिंदे गटातून धंगेकरांची हकालपट्टी होणार असल्याची चर्चा सुरू होती. आता या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे.
advertisement
पुण्यातील काही मुद्यांवर रविंद्र धंगेकर यांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुण्याच्या कोथरुड भागात घायवळ टोळीने गोळीबार केला होता. या घटनेवरून धंगेकर यांनी भाजपचे नेते आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर जैन बोर्डिंग जमीन घोटाळ्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली. त्यांचे लागेबंध असल्याचा इशारा धंगेकर यांनी केला. त्यानंतर भाजपने धंगेकर यांची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत धंगेकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी होणार असल्याचे वृत्त समोर आले. या वृत्तानंतर धंगेकर यांनी सोशल मीडियावर सूचक भाष्य केले आहे.
शिवसेनेचा लोगो हटवला...
रविंद्र धंगेकर यांनी त्यांच्या ‘X’ (माजी ट्विटर) अकाउंटवरून शिवसेनेचा लोगो असलेला कव्हर फोटो हटवला आहे. धंगेकरांनी कव्हर फोटो काढल्याने आता त्यांच्यावरील कारवाईच्या चर्चांना उधाण आले आहे. नवीन कव्हर म्हणून “Punekar First” असा संदेश झळकवला आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे पुण्यातील राजकीय वातावरणात नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.
रविंद्र धंगेकर यांच्या विरोधात पुण्यातल्या भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काल तक्रार केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे रविंद्र धंगेकर यांच्यावर कारवाई करतील अशी सूत्रांनी माहिती दिली होती. तर काल झालेल्या या घडामोडीनंतर रवींद्र धंगेकर त्यांनी त्यांच्या X वरील कव्हर फोटो बदलला आहे. 'पुणेकर फर्स्ट' असा कव्हर फोटो ठेवल्याने धंगेकर आता पुण्यात स्वतंत्रपणे काम करणार की पुन्हा नवी राजकीय समीकरणं जुळवणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
रविंद्र धंगेकरांनी पुन्हा डिवचलं...
रविंद्र धंगेकर यांनी नाव न घेता पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे. ते एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले की, 2024 ला एक जण मीडियामध्ये बातम्या पेरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आला होता. तो कोण आहे, हे आदरणीय फडणवीस साहेबांना माहीत आहे. आज तोच घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या बातम्या खोट्या बातम्या पेरतोय..! मन में हैं विश्वास..! हम होंगे कमयाब...!!, अशी पोस्ट धंगेकर यांनी केली.
