रोहित पवारांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन नवे प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवारांच्या प्रश्नांमुळे संशयाचं धुकं जास्त गडद झाल्यानं राजकीय वर्तुळात आणि राज्यात पुन्हा चर्चांना उधाण आलंय. डीजीसीएमध्ये बसून काहीजण कॉन्टॅक्टचा वापर करून रॅकेट चालवत असल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला.
मुख्य आरोपी अमेरिकेला का पळाला?
भाजपशी संबंधित कुटुंब आणि VSR कंपनीचे मालक रोहित सिंग यांचे संबंधही रोहित पवारांनी अधोरेखित केले. मुख्य आरोपी रोहित सिंग सध्या अमेरिकेत असून दुबईतही त्यांचे कार्यालय आहे. देशात इतका मोठा वादंग निर्माण झालेला असताना त्यांना परदेशात जाण्यास कोणी मदत केली, हा तपासातील महत्त्वाचा दुवा ठरू शकतो, असा मुद्दा रोहित पवारांनी उपस्थित केला.
advertisement
इंधन जास्त ठेवलं, त्यामुळेच वारंवार स्फोट
रोहित पवार यांनी, अपघातानंतर विमानात मोठे स्फोट झाल्याचा दावा केला. विमानात अतिरिक्त इंधनाचा साठा होता आणि त्यामुळेच वारंवार स्फोट झाल्याची शंका त्यांनी उपस्थित केली. ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या दाव्यावर रोहित पवारांनी मॅनिप्युलेशनचा आरोप केला. तसेच पायलटच्या मदतीने अजिदादांचा अपघात केला गेला का? असा सवालही त्यांनी विचारला.
पायलटच्या त्या कृतींवर रोहित पवारांचा आक्षेप
पायलट सुमित कपूर आणि कंपनीतील अनियमिततेबाबतही पवारांनी गंभीर दावे केले. सुमित कपूर हे तीव्र नैराश्यात होते आणि त्यांना महागड्या मद्याचे व्यसन होते. व्यसनामुळे त्यांना पूर्वी नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं. तसंच पायलटचे लायसन्स रद्द होणे, अनधिकृतरित्या दोन विमानं उडवणे, या बाबी अत्यंत गंभीर असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं.
कुटुंबीयांना माझी काळजी वाटतीये
अजित पवारांच्या अपघातावर प्रश्न उपस्थित करत असल्यामुळे कुटुंबीयांना माझी काळजी वाटत असल्याचं रोहित पवारांनी यावेळी सांगितलं. मात्र मी लढणार नाही तर मग कोण लढणार? असा प्रश्नही रोहित पवारांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन
तर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, हसन मुश्रीफ, पार्थ पवार यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आलं. दरम्यान रोहित पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे विमान कंपनी आणि चौकशीबाबतच संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या बाबत थेट वक्तव्य करण्यात आलं.
राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर विमान अपघाताचा तपास करणाऱ्या संस्थांकडून L3 संभाषणाचा डेटा मिळवण्यात यश आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरची सखोल तपासणी सुरू आहे. एकंदरीतच रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील सत्य आता तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येईल. मात्र तोपर्यंत राजकीय संघर्ष सुरूच राहणार आहे.
