नाशिक जिल्ह्यातील सिन्नरस्थित कॅप्टन अशोक खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कोणतीही कल्पना नाही, आता जे आरोप होत आहेत. त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील, पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे, असे चाकणकर म्हणाल्या आहेत.
सामाजिक कामांच्या निमित्ताने ट्रस्टशी जोडलो गेलो, ट्रस्टवर अनेक सन्माननीय व्यक्ती
शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो. ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, अशी पुष्टी जोडत कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही, असे म्हणत चाकणकर यांनी हात वर केले.
advertisement
अशोक खरात यांची चौकशी पोलीस निष्पक्षपणे करतील
कॅप्टन अशोक खरात यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप होत आहेत, त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील, पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास असल्याचे रूपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
आरोपीकडे ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. बलात्काराच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली आहे. या व्यक्तीला राजकीय आशीर्वाद कुणाचा आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या आरोपीच्या एका संस्थेच्या संचालिका आहेत. शोषित महिलांनी आता न्याय कुणाकडे मागायचा? सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमची अशी काय राजकीय अपरिहार्यता आहे की, सतत वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या रूपाली चाकणकरांना त्यांना पदावर का ठेवावे लागत आहे? चाकणकर आरोपींना राजाश्रय देत आहेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
चित्रा वाघ यांचीही चाकणकर यांच्यावर टीका
श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून, महिलांच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्या नाशिकचा भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातला बेड्या ठोकल्या. हेच आमच्या सरकारचे खरे काम आहे. गृह विभाग आणि राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं आहे की, कायद्यापुढे कोणीही मोठे नाही. वैयक्तिक श्रद्धा प्रत्येकाची असू शकते; पण संविधानिक पदावर असताना त्या श्रद्धेची मर्यादा पाळलीच पाहिजे, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी चाकणकर यांना सुनावले आहे. जबाबदारीच्या पदावर असणाऱ्यांनी विवेक आणि संवेदनशीलता दाखवणं अपेक्षित आहे. महिलांच्या सन्मानावर कुठलाही आघात आम्ही सहन करणार नाही हीच आमची ठाम भूमिका आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
