सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा जिल्ह्यातील कराड, कोरेगाव, सातारा, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव अशा पाच तालुक्यात आहे. कारखान्याच्या एकूण 32 हजार 205 सभासदांपैकी 26,081 सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सत्ताधारी पी डी पाटील पॅनलला तब्बल 15 हजाराहून अधिक मते मिळाली.
तर भाजप आमदार मनोज घोरपडे आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड. उदयसिंह पाटील यांच्या पॅनेलला 7000 ते 8000 दरम्यान मते मिळाली. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ आणि काँग्रेसचे निवास थोरात यांच्या तिसऱ्या पॅनेलला 2200 ते 2300 मते मिळाले.
advertisement
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तिरंगी लढत झाली या निवडणुकीसाठी 21 जागांसाठी तब्बल 70 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये 9 अपक्ष ही आपले नशीब आजमावत होते. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांनी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर सह्याद्री साखर कारखान्यात ही आमदारांकडून मोठ्या प्रमाणात टीका करत पराभव करणार असल्याचे व घरी बसणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र सभासदांनी पुन्हा एकदा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडेच कारखान्याची सत्ता अबाधित ठेवली.