रांजणगाव फाटा येथे असलेल्या पेट्रोल पंपावर चाकूचा धाक दाखवत काही तरुणांनी धुमाकूळ घातल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार तरुणांनी रांजणगाव शेणपुणजी येथील एका पेट्रोल पंपावर वाहन घेऊन पेट्रोल भरण्यासाठी धाव घेतली. मात्र, त्या वेळेस पंपावर पेट्रोल उपलब्ध नव्हते. कर्मचार्यांनी हे सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या तरुणांनी रागाच्या भरात कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली.
advertisement
या तरुणांनी चाकू दाखवत कर्मचाऱ्यांना धमकावले आणि पंपावर धुमाकूळ घातला. या प्रकरणामुळे परिसरात काही वेळ दहशतीचं वातावरण निर्माण झालं.घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आरोपींचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, अशा घटनांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. पेट्रोलपंपावरील सुरक्षेचा प्रश्नही यामुळे ऐरणीवर आला आहे.
