सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक गुरूवारी पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संगीता पाटील यांना ३४ मते पडली. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार स्वप्नाली मिसाळ यांचा पराभव केला. स्वप्नाली मासाळ यांना केवळ २५ मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्तम दिघे यांनी काम पाहिले.
अध्यक्षपदी संगीता पाटील तर उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड
advertisement
सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संगीता पाटील तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वजीत कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांची निवड झाली. भाच्याची उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मामाच्या आनंदाला पारावर उरला नाही. तसेच ऋषिकेश लाड यांच्या वडिलांनीही मुलाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याचा आनंद टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून व्यक्त केला.
अजित पवार गटाचा भाजपला पाठिंबा, शिवसेना गैरहजर
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्वप्नाली मासाळ यांना पाठिंबा दिला. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या दोन सदस्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीवेळी सभागृहात येण्याचे टाळले. सभागृहात गैरहजर राहून त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला पडद्याआडून मदत केली.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या?
सांगलीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक १८ जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. त्याखालोखाल भारतीय जनता पक्षाला १६, काँग्रेसला ११, शिंदे शिवसेनेला ७, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला ६ तर जनसुराज्य, ठाकरेंची शिवसेना आणि रयत क्रांतीला प्रत्येकी १ जागा मिळाली होती.
