महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काही वर्षानंतर या निवडणुका होत असल्याने अनेक इच्छुकांची उमेदवारीसाठी चढाओढ लागली आहे. स्थानिक पातळीवरील राजकारण पेटलं आहे. काही ठिकाणी युती-आघाडी झाली असली तरी एकाच ठिकाणांहून मित्रपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे समोर आले. मात्र, सांगलीतील या घटनेनंतर चांगलीच खळबळ उडाली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी सुनीता व्हनमाने यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केली. यावेळी त्यांचा मुलगा संदीप व्हनमाने यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव टाकण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचा गंभीर आरोप संदीप व्हनमाने यांनी केला आहे.
संदीप व्हनमाने यांच्या आरोपानुसार, प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाच्या पॅनलमधील उमेदवार सागर वनखंडे यांच्या समर्थकांनी हा हल्ला केला. मात्र हे सर्व आरोप शिंदे गटाचे उमेदवार सागर वनखंडे यांनी फेटाळून लावले आहेत. “निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहानुभूती मिळवण्यासाठी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. तोडफोड करणाऱ्या संशयितांशी संबंधित व्यक्तींशी माझे पूर्वीपासून काही वाद होते, त्यातूनच हा प्रकार घडला असावा. या घटनेशी माझा किंवा माझ्या समर्थकांचा काहीही संबंध नाही,” असे स्पष्टीकरण सागर वनखंडे यांनी दिले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे सांगली महापालिका निवडणुकीतील तणाव अधिक वाढला असून, पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
