स्वप्नील कामिरे असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. कार चालवायला शिकत असताना झालेल्या विचित्र अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत स्वप्नील कामिरे या युवकाने सोमवारी रात्रीच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीकडून चारचाकी गाडी चालवायला शिकण्यासाठी घेतली होती. रात्रीच्या वेळी तो गाडी चालवण्याचा सराव करत होता. काही अंतरावर गाडी गेल्यानंतर त्याचा गाडीवरील ताबा सुटला.
advertisement
गाडी अनियंत्रित झाल्यामुळे चारचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विहिरीमध्ये कोसळली. या अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले.
रात्री उशिरा बचावकार्य
नागरिकांनी स्वप्नीलला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, गाडी विहिरीत पूर्णपणे बुडाल्यामुळे त्याला बाहेर काढणं अत्यंत कठीण झालं होतं. अखेर, रात्री उशिरा जेसीबीच्या सहाय्याने ही अपघातग्रस्त चारचाकी विहिरीतून बाहेर काढण्यात आली.
दुर्दैवाने, या भीषण अपघातात स्वप्नील कामिरे याचा मृत्यू झाला. स्वप्नील हा उत्साही युवक होता आणि त्याचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने शिंदेवाडी गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
