मिळालेल्या माहितीनुसार, कवठेमहांकाळ तालुक्यातील जाखापूर येथील काही महिला गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी एसटी बसने प्रवास करत होत्या. गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरून ही बस योगेवाडीजवळ आली असता, समोरून येणाऱ्या कंटेनरने बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बसचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात गोंधळ उडाला आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
advertisement
अपघातामध्ये बसचालक गंभीर जखमी झाला असून, सहा महिला प्रवाशांनाही मार लागला आहे. सर्व जखमींना तातडीने तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्यांना पुढील उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. या घटनेची नोंद स्थानिक पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.