घरच्यांना न सांगता लग्न केलं पण...
उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील नीतू उर्फ शालिनी यादव हिचा खून तिचा पती आकाश उर्फ विनायक दीनदयाळ यादव आणि सासरा दीनदयाळ रामबाली यादव यांनी मिळून केला होता. नीतू ही तिच्या पहिल्या पतीपासून विभक्त झाली होती, त्यानंतर तिची ओळख आकाशसोबत झाली आणि दोघांनी घरच्यांना न सांगता लग्न केलं होतं. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्यात खटके उडू लागले. नीतूने पतीविरोधात पोलीस तक्रारही केली होती, ज्याचा राग आकाशच्या मनात होता. पत्नीकडून वारंवार होणारा त्रास आणि तिच्या चारित्र्यावरील संशयामुळे वैतागलेल्या बाप-लेकाने तिला संपवण्याचा कट रचला.
advertisement
मृतदेहापासून काही अंतरावर एक रेल्वे तिकीट सापडलं अन्...
या कटाचा भाग म्हणून 16 डिसेंबर रोजी आरोपींनी नीतूला जौनपूरवरून रेल्वेने मिरजमधील टाकळी इथं आणलं. तिथं शॉलने तिचा गळा आवळून निर्घृण हत्या केली आणि तिचा मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला. गुन्हा केल्यानंतर आरोपी पुन्हा रेल्वेने उत्तर प्रदेशला पळून गेले होते. स्थानिक गुन्हे शाखेला घटनास्थळाच्या पाहणीत मृतदेहापासून काही अंतरावर एक रेल्वे तिकीट सापडले. या एका धाग्यावरून तपास सुरू झाला. मिरज रेल्वे स्टेशनबाहेरील एका चिक्की विक्रेत्याकडे केलेल्या आर्थिक व्यवहाराचा पुरावा मिळाल्याने पोलिसांना संशयितांपर्यंत पोहोचणं सोपं झालं.
ब्लाइंड मर्डर केसचा छडा लावला
दरम्यान, सांगली पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत मुख्य आरोपी आकाश याला हरियाणा येथून तर वडील दीनदयाळ यादव याला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतले. केवळ एका रेल्वे तिकिटाने या ब्लाइंड मर्डर केसचा छडा लावल्याबद्दल सांगली पोलीस दलाचे कौतुक होत आहे. घरगुती वादातून आणि संशयातून एका महिलेचा अंत झाल्याने या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे.
