बाप्पा मोरया! नव्या वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी, दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची गर्दी, Video
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Dagdusheth Ganpati: पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे : नववर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी मंगळवारी मोठ्या भक्तिभावात साजरी होत आहे. या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. ओम् गं गणपतये नमः, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. अंगारकी संकष्टीचे विशेष महत्त्व लक्षात घेता राज्यासह देशातील विविध भागांतून भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने मंदिरात भव्य पारंपरिक पुष्पआरास करण्यात आली. मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत झेंडू, गुलाब, शेवंती आदी विविधरंगी फुलांनी केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. पारंपरिक शैलीत साकारलेली ही पुष्पसजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला आहे. सभामंडपातही सुबक आणि देखणी फुलांची आरास करण्यात आली आहे.
advertisement
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक, श्री गणेशयाग यांसारखे धार्मिक विधी भक्तिभावात पार पडले. मंगलआरतीसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळते. गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिर भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.
advertisement
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाच्या वतीने दर्शनासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर रस्ता ते अप्पा बळवंत चौकाच्या पुढील भागापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. मंदिरावर आकर्षक तोरणे, रांगोळ्या आणि सजावटीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला आहे.
नववर्षातील पहिल्या अंगारकी संकष्टीच्या योगामुळे भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळतो. शांतता, शिस्त आणि भक्तिभावाच्या वातावरणात हजारो भाविक श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत गणरायाच्या चरणी मनोभावे प्रार्थना करताना पाहायला मिळत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 11:46 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
बाप्पा मोरया! नव्या वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी, दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची गर्दी, Video








