प्राथमिक माहितीनुसार, येडेनिपाणी फाट्याजवळील अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू आले. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीला तत्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने ईश्वरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले असून पुढील उपचार सुरू आहेत.
पुरावे गोळा करण्यास सुरुवात
घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलीस व ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे. तसेच, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून संशयितांचा शोध घेण्यासाठी तपास पथकांची अनेक पथके रवाना करण्यात आली आहेत.
advertisement
गोळीबार नेमका कशासाठी?
गोळीबार नेमका कोणी व कशासाठी केला याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. वैयक्तिक वाद, आर्थिक देवाणघेवाण किंवा जुन्या वादातून ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पोलीस प्रशासनाने याबाबत अधिकृत माहिती देण्यास अद्याप नकार दिला आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. महत्त्वाच्या महामार्गाजवळच गोळीबार झाल्याने थोडावेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे काही काळासाठी परिसरात वाहतूक नियंत्रण ठेवण्यात आले होते.
अफवांवर विश्वास ठेवू नका
पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करण्याचे आवाहन केले असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. पुढील तपास सुरू असून अधिक माहिती मिळाल्यावर सविस्तर खुलासा होणार आहे.
