मागील शंभर वर्षात असा पाऊस झाला नसल्याचे स्थानिक सांगतात. अनेकदा मान्सूनपूर्व पाऊस वेळेआधी दाखल होतो. परंतु यंदाप्रमाणे एकसारखा आणि महिनाभरहून अधिक काळ लांबून राहत नाही. स्थानिक पत्रकार सचिन करमाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शिराळा तालुक्यात विशेषतः धूळवाफेवरील पेरण्या केल्या जातात. रोहिणी नक्षत्राच्या उत्तरार्धात म्हणजेच मे महिन्याच्या अखेरीस पेरण्या होतात. परंतु यंदा 12 मे पासून सुरू झालेला मान्सूनपूर्व पाऊस जूनच्या अखेरीपर्यंत सुरूच राहिला.
advertisement
मध्यंतरी थोडी उघडीप मिळेल अशी शेतकऱ्याला आशा होती परंतु तसे झाले नाही. परिणामी गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू असलेली शिराळ्यातील धूळवाफेवरील पेरणीची परंपरा यंदा पहिल्यांदाच खंडित झाल्याचे सचिन यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
धूळवाफेवरील पेरणीची परंपरा खंडित
प्रत्येक वर्षी शिराळा तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी मे महिन्याच्या पंधरा तारखेनंतर धूळवाफेवरील पेरणी करतात. वळिवाच्या पावसानंतर मऊ झालेल्या शेतांमध्ये पूर्व मशागत करतात. रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरड्या मातीत पेरणी केली जात होती. यंदा मे महिन्यातील वळीव, ढगफुटी, बिगरमोसमी व त्यानंतर पूर्वमोसमी अशा वेगवेगळ्या रुपात झालेल्या पावसाने धूळवाफेवरील पेरण्या करताच आल्या नाहीत.
इंद्रायणीसारख्या सुधारित भातांच्या लावणी देखील शिराळा तालुक्यात करतात. परंतु शिराळ्यात पिकणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण जाड भाताची पेरणीच केली जाते. हीच धूळपेरणी यंदा करता आली नसल्याने शिराळ्यातील पारंपरिक भात शेती संकटात सापडल्याचे स्थानिक सचिन करमाळे यांनी सांगितले.
पेरणी झालेल्या क्षेत्रास पाखरांचा वाढता धोका
शेतकऱ्यांनी माळरानांमध्ये भुईमुगाच्या पेरण्या केल्या आहेत. तसेच काही शेतांमध्ये सोयाबीन पेरले आहे. परंतु वेळेवर पेरण्या न झाल्याने पारवे, लांडोर अशी पाखरे बिया उपसत आहेत. काही शेतांमध्ये अति पावसाने सोयाबीन कुजले आहे. संकटांच्या मालिकेतून तुरळक ठिकाणी झालेल्या पेरणीतून उत्पादन हाती लागेल याची शाश्वती नाही.
अति पावसाने ओला दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. खरीप जवळजवळ वाया गेल्याच्या हृदयद्रावक चित्राने हवालदिल होत, शेतकरी बदलत्या निसर्गासोबत जगण्याचे नवे पर्याय शोधत आहेत.