ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, राज्याच्या सरकारमध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आले आहेत. राज्याच्या सरकारचे नियंत्रण अमित शाह यांच्या हाती आहे. त्यामुळे आता मोठे निर्णय घेण्याची स्थिती निर्माण झाली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
advertisement
राऊत यांनी म्हटले की, मागील काही दिवसांपासून मी 4 मंत्री जाणार असल्याचे सांगतोय. आता मंत्रिमंडळाची सफाई करून नवीन मंत्रिमंडळ आणण्याबाबत दिल्लीत मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून सरकारमधील भ्रष्टाचार, मंत्र्यांचे शेतकरी विरोधी वक्तव्य, घोटाळे, लेडीज बार, समोर आलेल्या पैशांच्या बॅगा याचे ओझं मु्ख्यमंत्री फडणवीसांवर झाले आहे. आता त्यांना ते ओझं फेकून देता येत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
शिंदेंच्या निकटवर्तीयाला अटक, अडचणीत कोण?
संजय राऊत यांनी म्हटले की, गुरुवारी झारखंडमधून एक पथक आले आणि अमित साळुंखे याला अटक केली आणि त्याला आपल्यासोबत घेऊन गेले. अमित साळुंखे हा सुमित फॅसिलिटीचे संचालक आहे. राज्यातील '108 रुग्णवाहिका' घोटाळ्याचा हा सूत्रधार आहे. 800 कोटींचा हा घोटाळा आहे. त्याशिवाय, हा अमित साळुंखे हा 'श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशन'चा आर्थिक कणा आहे. अमित साळुंखेने घोटाळ्याचा पैसा या फाऊंडेशनकडे वळवला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
मंत्रिमंडळापर्यंत धागेदोरे...
संजय राऊत यांनी म्हटले की ही अटक सहज झाली नाही. सरकारला या पैसाचे कुठं पाय फु्टले हे शोधायचे आहे. या प्रकरणाचे धागेदोरे हे राज्याच्या मंत्रिमंडळापर्यंत येत आहेत. हे प्रकरण सोपं नाही. श्रीकांत शिंदे यांच्या जवळच्या व्यक्तीला अटक केलीय, हे महत्त्वाचं असून आता हे प्रकरण ईडीकडे जाणार असल्याचा दावा राऊतांनी केला. कोणाचे पैसे किती अडकले, फाउंडेशनला किती गेले, निवडणुकीत किती वापरले, कोणाकडे किती पैसे गेले, याचा सगळा तपास होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
अमित साळुंखेला अटक का?
झारखंडमधील मद्य घोटाळा प्रकरणी झारखंड पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमित साळुंखेला अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, अमित साळुंखे हा छत्तीसगडमधील मद्य व्यावसायिक सिद्धार्थ सिंघानियाचा निकटवर्तीय आहे. सिंघानियाच्या चौकशीदरम्यान आढळलेल्या तथ्यांच्या आधारे अमितला अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.