नेमकं प्रकरण काय?
ऑक्टोबर महिन्यात मुंबईच्या सांताक्रुझ येथे एका किराणा मालाच्या व्यापाऱ्याच्या घरी चोरी झाली होती. घरातून १८ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला होता. या प्रकरणाचा सांताक्रुझ पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारदार व्यापाऱ्याची मुलगी निकिता धनजी हाथियानी आणि तिचा प्रियकर रविंद्र नारायण निरकर या दोघांना अटक केली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रुझ येथील तक्रारदार व्यापारी त्यांच्या किराणा दुकानातून मिळालेले सहा लाख रुपये आणि गुजरातमधील वडिलोपार्जित जमीन विकून मिळालेले सहा लाख रुपये, अशी एकूण १२ लाख रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने एका धातूच्या डब्यात ठेवून बेडरूममध्ये ठेवले होते.
१८ नोव्हेंबर रोजी तक्रारदार व्यापाऱ्याची पत्नी आणि मुलगी निकिता या दोघीही मार्केटमध्ये गेल्या होत्या. घरात कोणी नसण्याची संधी साधून एका अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करत कॅश आणि दागिने असलेला डबा पळवून नेला होता. पत्नीच्या लक्षात हा प्रकार येताच, त्यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.
प्रेमसंबंध आणि चोरीचा कट
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना तक्रारदार व्यापाऱ्याची मुलगी निकिता आणि तिचा प्रियकर रविंद्र यांच्यावर संशय आला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी चोरीची कबुली दिली.
निकिता आणि रविंद्र यांचे प्रेमसंबंध होते आणि त्यांना लग्न करायचं होतं. मात्र, लग्नासाठी आर्थिक अडचण येत असल्याने निकिताने घरातील रोकड आणि दागिन्यांची माहिती रविंद्रला दिली. तिनेच घरी चोरी करण्याचा सल्ला दिला. तसेच ती आपल्या आईसोबत घराबाहेर गेल्याची टीपही तिने दिली. यानंतर बॉयफ्रेंडने घरात प्रवेश करून ही चोरी केली. चोरीची कबुली मिळाल्यानंतर सांताक्रुझ पोलिसांनी दोघांना अटक केली.
