CM फडणवीसांसोबतच्या भेटीत काय झालं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत बोलताना धुरी म्हणाले की, "काल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. विशेष म्हणजे, त्यांनी तत्काळ वेळ देत माझ्या भावना समजून घेतल्या. आमच्यात सविस्तर चर्चा झाली आहे." या भेटीमुळे राजकीय समीकरणे बदलणार का, या प्रश्नावर त्यांनी "ही केवळ सदिच्छा भेट होती" असे सांगत अधिक भाष्य करणे टाळले.
advertisement
> राणे कुटुंबीयांशी संबंधांवर भाष्य
भाजप आमदार नितेश राणे यांनी धुरींशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली होती. त्यावर धुरी म्हणाले, "नितेश राणे यांनी माझ्याशी संपर्क केला होता. आमच्यात चांगल्या गप्पा झाल्या. नितेश राणे हे आमच्या कोकणातील आहेत आणि ते नेहमीच मदतीला धावून येतात, हे नाकारता येणार नाही." विशेष म्हणजे, या संपूर्ण भेटीगाठींमध्ये निवडणुकीची उमेदवारी हा विषय अजिबात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
> 'नॉट रिचेबल' आणि मनसेवर निशाणा?
गेल्या दोन दिवसांपासून धुरी 'नॉट रिचेबल' असल्याच्या बातम्यांनी जोर धरला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, "मी नॉट रिचेबल वगैरे काही नव्हतो, त्या केवळ बातम्या होत्या." मात्र, यावेळी त्यांनी मनसेवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. "या काळात मनसेमधून माझ्याशी कोणीही संपर्क साधला नसल्याचे त्यांनी म्हटले.
> संदीप देशपांडेंशी मैत्री राहणार?
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याशी असलेल्या संबंधांवर बोलताना धुरी म्हणाले, "संदीप देशपांडे यांच्यासोबत माझी मैत्री कायम राहील, पण ती त्यांनी ठेवली तर! आम्ही राजकारणात एकमेकांचे विरोधक असल्यामुळे टीका ही होणारच, पण मैत्री वेगळी असते, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
> अटी-शर्तींशिवाय राजकारण
भविष्यातील वाटचालीबाबत विचारले असता धुरी यांनी स्पष्ट केले की, "मी अत्यंत शिस्तप्रिय कार्यकर्ता आहे. जेव्हा मी राज ठाकरे यांच्याकडे आलो होतो, तेव्हाही कोणतीही अट ठेवली नव्हती आणि आजही माझ्या कोणत्याही अटी-शर्ती नाहीत असेही त्यांनी म्हटले.
> आज दुपारी राजकीय वाटचाल ठरणार...
आज दुपारी आपली राजकीय वाटचाल ठरणार असल्याचे संतोष धुरी यांनी सांगितले. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष धुरी आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश पार पडणार आहे.
