मुंबई: महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पहिला वार केला आहे. "मनसेची केवळ चेष्टा केली जात असून दुसऱ्यांना निवडून आणण्यासाठी मनसेचा वापर केला जात आहे," असा खळबळजनक आरोप धुरी यांनी केला आहे.
कुटुंब एकत्र आले पण...
advertisement
निवडणूक निकालांचे विश्लेषण करताना संतोष धुरी म्हणाले की, मनसेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खूप मोठा गाजावाजा केला होता. मात्र, निकाल पाहता मनसेची अक्षरशः चेष्टा झाली असल्याचे त्यांनी म्हटले. यापूर्वी मनसेचे ८ नगरसेवक निवडून आले होते, पण आता कुटुंब एकत्र येऊनही मनसेला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले असल्याचे त्यांनी म्हटले.
वरळी आणि माहीममध्ये मनसेचा 'गेम' झाला?
महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकारणात मनसेचा केवळ वापर करून घेतला जात असल्याचा दावा धुरी यांनी केला. विशेषतः वरळी मतदारसंघाचा उल्लेख करताना ते म्हणाले, "वरळीत मनसेची हक्काची एक जागाही जिंकता आली नाही. जाणीवपूर्वक शिवसेना ठाकरे गटाकडून तिथे दुसरा उमेदवार देण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच माहीम आणि दादर या मनसेच्या बालेकिल्ल्यांमध्ये पक्ष किती कमी फरकाने हरला आहे किंवा मागे पडला आहे, हे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आम्ही गद्दार नाही...
मनसे सोडून बाहेर पडणाऱ्यांवर होणाऱ्या 'गद्दार' या टीकेलाही संतोष धुरी यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "जे लोक पक्ष सोडून बाहेर पडले, त्यांना तुम्ही गद्दार म्हणणार का? मनसेत असणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या अनेकांनी आधीच भाकीत केले होते की भाजपच विजयी होणार. मात्र, आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
जागा वाटपाच्या वेळी मनसेने जो गोंधळ घातला, त्याचा फायदा केवळ दुसऱ्या पक्षांना झाला असून मनसे कार्यकर्त्यांचा वापर केवळ इतरांना निवडून आणण्यासाठी केला जात असल्याची टीका धुरी यांनी केली.
