मुंबई: मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला. सोमवारी रात्री संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आज भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल केला. हिरव्या रंगाशी मनसेची युती झाली असल्याचा वार धुरी यांनी केला. राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटले.
advertisement
आज मुंबईत भाजपात पक्ष प्रवेश केल्यानंतर संतोष धुरी यांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली. मला महापालिकेसाठी उमेदवारी दिली नाही म्हणून पक्ष सोडला नसल्याचे धुरी यांनी सांगितले. धुरी यांनी सांगितले की, ठाकरे बंधूंच्या युतीत मनसेला अशा जागा दिल्यात जिथं ठाकरेंकडे उमेदवार नव्हते. अथवा त्यांचे विद्यमान नगरसेवक बदनाम होते, त्या जागा मनसेच्या माथी मारण्यात आल्याचा दावा धुरी यांनी केला. जिथं मनसेची ताकद होती, ती जागा आम्हाला दिली नाही. दादर, लालबाग, शिवडी, भांडूप या मराठी भागात आम्हाला एकच जागा दिली. मनसेच्या जागाही ठाकरे गटाला देण्यात आल्याचे संतोष धुरी यांनी सांगितले.
दोन किल्ले तहात गमावले..
संतोष धुरी यांनी म्हटले की, मला उमेदवारी दिली नाही, याचा राग नाही. पण, संदीप देशपांडे यांना कोणत्याही चर्चेत घेतलं गेलं नाही. याबाबत विचारणा केल्यावर सांगण्यात आले की वरच्या नेत्यांनी तह केला आहे. या तहात दोन किल्ले राज ठाकरे यांनी गमावले. तहात सांगितले की संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे चर्चेत दिसता कामा नये, असे म्हटले. त्यामुळे आता मनसेत राहणे योग्य नव्हतं. त्यामुळे मी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे धुरी यांनी सांगितले.
राज ठाकरे तहात हरले, कुटुंबासाठी पक्ष सरेंडर...
संतोष धुरी यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित करताना पक्ष उद्धव ठाकरेंसमोर सरेंडर केलं असल्याचे धुरी यांनी सांगितले. जसं उद्धव ठाकरेंनी सूत्र हाती घेतल्यावर बाळासाहेबांचे शिलेदार दूर गेले, तसंच आता राज ठाकरेंचे शिलेदार दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरे हे तहात हरले. त्यांनी शिवसेनेसमोर शरणागती घेतली. संजय राऊत, अनिल परबांसमोर शरणागती पत्करली असल्याचे धुरी यांनी सांगितले. आमचे ६ नगरसेवक पळवले, नेत्यांचा त्रास दिला.
आमच्या अनेक शिलेदारांना त्रास दिला, त्यांच्यासोबत युती झाली आहे. जसं उद्धव ठाकरेंनी सूत्र हाती घेतल्यावर बाळासाहेबांचे शिलेदार दूर गेले, तसंच आता राज ठाकरेंचे शिलेदार दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संतोष धुरी यांनी केला.
