सातारा : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस त्यांच्या साताऱ्यातील दरे या गावी मुक्कामी होते. राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी घडत असताना शिंदे त्यांच्या गावी गेल्यानं ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, त्यांची प्रकृतीही बिघडली होती. उपचार घेतल्यानंतर एकनाथ शिंदे रविवारी सायंकाळी मुंबईत परतले. मुंबईला परत येत असताना एकनाथ शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा दोन महिलांनी अडवला. त्यातील एक महिला दिव्यांग तरुणाची आई होती. आपल्या अडचणी दिव्यांग तरुणाच्या आईने एकनाथ शिंदे यांना सांगितल्या.
advertisement
एकनाथ शिंदे हे रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुंबईला येण्यासाठी निघणार होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांसह ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं. तेव्हा ते गावातील जुन्या घरी आणि इतर नातेवाईकांनाही भेटले. गावातून बाहेर पडत हेलिपॅडच्या दिशेनं येत असताना वाटेत दिव्यांग तरुण आणि त्याच्या आईने एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला. दिव्यांग तरुणाच्या आईने एकनाथ शिंदे यांच्या गाडीच्या दिशेनं धाव घेतली. एकनाथ शिंदे यांनी गाडी थांबवून विचारपूस केली.
दिव्यांग तरुणाच्या आईने शिंदेंसमोर आपल्या अडचणी सांगितल्या. तरुण मुलगा दिव्यांग असल्यानं कुटुंब आर्थिक अडचणीत सापडलं आहे. सरकारकडून आपल्याला काही मदत व्हावी अशी त्यांना अपेक्ष आहे. खंडाळा तालुक्यातल्या कवठे इथून मायलेक आले होते. शिंदे यांनी त्यांची अडचण ऐकून घेतल्यानंतर आपल्याला शिंदे मदत करतील अशी आशा त्यांना वाटते.