सातारा : भगवान शंकराला देवांचा देव महादेव असे म्हटले जाते. महादेवाची आराधना केल्याने जीवन आनंदी राहते. भगवान शिवाला शंकर, महादेव, भोलेनाथ अशी अनेक नावे आहेत. त्याचबरोबर अनेक अवतार देखील महादेवाचे पाहिले जातात. अनेक गावांमध्ये महादेवाची अति प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात. असेच साताऱ्यातील माण तालुक्यात बेलदेव महादेव मंदिर आहे.
हे मंदिर अत्यंत पुरातन आणि शिवकालीन असल्याचे सांगण्यात येते. या मंदिराला एक वेगळेच महात्मा प्राप्त झाले आहे. या मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे. या मंदिरापासून शिखर शिंगणापूर जे महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते ते काही अंतरावरच आहे. बेलदेव मंदिर परिसरात ढोल, नगाडे, सनई, ताशे याच्या गजर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो.
advertisement
त्याचबरोबर पारंपारिक गाणी नृत्य त्याचबरोबर माणदेशी गजर नृत्य यावेळी हजारोंच्या उपस्थितीत भक्तगण सादर करतात.
बेलदेव मंदिरात 700 वर्षांपासून श्रावणामध्ये भंडारा घालण्याची परंपरा सुरू आहे. महादेव मंदिरासमोर पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांसाठी, पाहुण्यांसाठी हे भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. या भंडार्याला महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने भाविक येतात.
रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले तरुणाचे प्राण, काळजाचा ठोका चुकविणारी सोलापुरातील घटना, VIDEO
यावर्षीही हा भंडारा करण्यात आला. तब्बल 25 क्विंटलच्या पुरणपोळ्या यावेळी 2000 हून अधिक महिलांनी 1000 चुलीवर बनवल्या. या स्वयंपाकासाठी पुरुषवर्गाने डाळ शिजवत पुरण तयार केले. त्यानंतर महिला या चुलीवर पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. येणाऱ्या पाहुणे, ग्रामस्थ मंदिराच्या जवळ येऊन या भंडाऱ्यात प्रसाद सेवन करतात. यामध्ये सर्व जाती, पंथाची लोक एकत्र येऊन हा भंडारा साजरा करतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या मंदिराची मालकी त्यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती आईसाहेब कल्पनाराजे भोसले यांच्याकडे आहे. दरवर्षी राजघराण्यातील व्यक्ती बेलदेव मंदिरात येऊन नतमस्तक होतात. अशा या अनोख्या परंपरेत धर्म, जात, पंथ विसरून सर्व ग्रामस्थ एकत्र येतात आणि हा महाभंडारा करतात, असे गावातील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सांगितले.