अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सोमवारी साताऱ्यातील वाई येथे होती. सभेतील भाषणानंतर त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. लाडकी बहीण योजना, महायुतीतील पक्षांतरे, जागा वाटपाच्या चर्चा आदी मुद्द्यांना त्यांनी उत्तरे दिली.
अजित पवार म्हणाले, काही जण इकडे तिकडे जातात. निवडणुकांत असले प्रकार चालतात. आमच्याकडे ४० आमदार आहेत. आमच्याकडे जास्त आमदार असल्यामुळे नवीन जागा घेण्याला मर्यादा आहेत. त्यांच्याकडे (पवार गट) आमदारांची संख्या कमी असल्याने अनेक जण जात आहेत. माझ्याकडच्या 40 पैकी काही आमदारांना वाटलं तर ते ही वेगळी भूमिका घेऊ शकतात, असे अजित पवार म्हणाले.
advertisement
रामराजे नाईक निंबाळकर पक्षात नाराज आहेत, असे विचारल्यावर ते म्हणाले, रामराजेंचा मला फोन आला होता. उद्या मुंबईमध्ये त्यांच्या सोबत बोलणार आहे. त्यांच्यासोबत बोलून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ
हर्षवर्धन पाटील यांच्या टीकेवर विचारले असता प्रत्येकाच्या बोलण्याला उत्तर द्यायला मी बांधिल नाही. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. मला सभेत जे बोलायचे होते, ते मी बोललोय. आयाराम गयारामांवर त्यांची (शरद पवार) भूमिका काय होती आणि तिकडे जाऊन ते काय बोललेत, हे चॅनेल्सनेच दाखवलेय. माझ्याकडच्या 40 मधल्या काही आमदारांना वाटले तर ते वेगळी भूमिका घेऊ शकतात, लोकशाही आहे. काँग्रेस राष्ट्रवादीमधल्या काही लोकांना देवेंद्रजींनी मागील काळात घेतले होते. मात्र त्यातलीच काही लोक आता माघारी फिरली आहेत. हर्षवर्धन पाटील यांना देखील घेतले होते. त्या ठिकाणी आपल्याला जागा मिळणार नाही असे त्यांना वाटले असेल, असेही अजित पवार म्हणाले.
आमदार मकरंद आबा पाटील यांचे अजित पवार यांच्याकडून कौतुक
वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद आबा पाटील यांनी आपल्या भागात विकास कामं मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली एकूण ४ हजार कोटी रुपयांची विकास कामं पूर्ण झाली. मकरंद आबा पाटील हे एक कार्यशील व्यक्तिमत्व आहेत.
राज्य सरकारनं सुरू केलेल्या योजना ह्या सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून अतिशय उपयुक्त ठरत आहेत. माझी लाडकी बहीण योजना ही एवढी लोकप्रिय ठरली की, भगिनी समोर येऊन समाधान व्यक्त करत आहेत. या योजनेंतर्गत मिळालेल्या पैशातून छोट्या-मोठ्या व्यवसायासाठी पैसे उभे झाले, असं त्या आनंदानं सांगतात. हे ऐकताच यातून मिळणारा आनंद न्याराच आहे.
आम्ही मुलींसाठी शिक्षण मोफत केलं. शेतकरी बांधवांना वीज बिल माफी दिली. दुधावर प्रतिलिटर ५ ऐवजी आता ७ रुपये अनुदान देऊ केलं. कांद्यावरील निर्यातबंदी उठवली. पाण्याचा प्रश्न सोडवण्याची धमक आमच्यात आहे, तो प्रश्न सुद्धा मिटवणार. सर्व समाज घटकाला, जाती-धर्माच्या लोकांना समान न्याय व लाभ देणं अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आला आहे आणि यापुढेही करत राहील.
