सातारा : बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर अत्याचारानंतर रेल्वे रोको आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं आणि लहान मुलीवरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केला. या घटनेचं राजकारण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आलीय. त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी याबाबत पोलिसांना सूचना दिल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
advertisement
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बदलापूरमध्ये झालेली घटना दुर्दैवी आणि दु:खद आहे. लहान मुलींवर अत्याचार झाले हे दुर्दैवी आहे. त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे असे निर्देश पोलीस आय़ुक्तांना दिले आहेत. आरोपीला अटक झालीय. त्याच्यावर बलात्कार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे आदेश दिले आहे.
पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल करून घेण्यात दिरंगाई केली. त्या पोलिसांवरही कारवाई केली. पोलिसांना निलंबित केलंय. पीडित कुटुंबाच्या मागे सरकार आहे. त्या कुटुंबाला आवश्यक ते सहाकार्य केलं जाईल. शाळेत घडलेल्या घटना प्रकरणी संस्थाचालकांच्या चौकशीचे आदेश दिलेत. तसंच नियम न पाळणाऱ्या संस्थाचालकांवर कारवाई करावी असे अदेश दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भविष्यात अशा घटना घडू नयेत यात आणखी कडक नियम करण्याचे प्रयत्न केले जातील. मुली शिक्षण घेतात तिथं जास्त काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
Badlapur : बदलापूर आंदोलनाबाबत पोलिसांचा धक्कादायक खुलासा, व्हॉइस रेकॉर्डिंग हाती; 68 जणांना अटक
आंदोलनाबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, दुर्दैवाने लाखो प्रवाशांना त्रास झाला. ८ तास रेल्वे बंद होती. हे व्हायला नको होतं. त्यातही मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक होते. कालचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं. स्थानिक हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या तरी आंदोलक हटले नाहीत. गाड्या भरून आंदोलन स्थळी बाहेरून लोक आले होते. आंदोलनात स्थानिक लोक असतात पण इथं इतर ठिकाणाहून गाड्या भरून आंदोलक आले. सगळ्या मागण्या मान्य केल्या तरी हटत नव्हते. त्यांना सरकारला बदनाम करायचं होतं. ८ - ९ तास रेल्वे रोखणं हे देशाचं, रेल्वेच्या संपत्तीचं नुकसान आहे.
लहान मुलीवरून राजकारण केलं. दुर्दैवी घटनेचं राजकारण करणं लज्जास्पद, ज्यांनी केलं त्यांना लाज वाटली पाहिजे. सगळ्या गाड्या भरून आल्या ते सीसीटीव्हीमध्ये आहे. कोणत्या पक्षाचा हात ते पोलीस शोधतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, याचे पोस्टर घेऊन आले होते. लगेच बोर्ड छापून आणले? लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण हवी हे पोस्टर होते. सुरक्षित बहीणीची जबाबदारी आमची आहे. सरकारची आहे. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. मुख्यमंत्री योजना विरोधकांच्या जिव्हारी लागलीय त्याचा पोटशूळ बदलापूरच्या आंदोलनातून दिसला असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.
