सातारा: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती सर्वत्र साजरी होत आहे. बाबासाहेबांच्या जीवनात शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यामुळेच त्यांनी समाजाला 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा मूलमंत्र दिला. बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीबद्दल अनेकांना कुतुहल असतं. त्यांनी जगभरातील नामांकित संस्थांमधून शिक्षण घेतलं. पण त्यांच्या प्राथमिक शिक्षणाबद्दल अनेकांना माहिती नसेल. साताऱ्यातील श्रीमंत्र छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतले. विशेष म्हणजे ही शाळा आजही विद्यार्थी घडवण्याचे काम करतेय.
advertisement
चौथीपर्यंत शिक्षण साताऱ्यात
बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण साताऱ्याच्या राजवाडा परिसरातील हायस्कूल येथे झाले. 7 नोव्हेंबर 1900 रोजी त्यांनी पहिल्या इयत्तेसाठी सरकारी शाळेत प्रवेश घेतला. त्यानंतर चौथीपर्यंतचं शिक्षण त्यांनी याच शाळेत पूर्ण केलं. जीर्ण झालेल्या रजिस्टरमध्ये भीमा रामजी आंबेडकर हे नाव आजही दिसते. शाळेतून जे विद्यार्थी घडले त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक मोठं नाव आहे, असे मुख्याध्यापक सन्मती देशमाने सांगतात.
ऐतिहासिक शाळा
छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी 1824 मध्ये शाळेची इमारत असणारा वाडा बांधला. या ठिकाणी सरकारी शाळा सुरू केली. या शाळेतून अनेक दिग्गज घडले. यापैकीच बाबासाहेब आंबेडकर हे एक होते. पुढे शाळेचं नाव श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल करण्यात आले. आजही ही शाळा दिमाखात उभी असून अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे.
Babasaheb Ambedkar Jayanti : बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना द्या 'या' प्रेरक शुभेच्छा..!
दरम्यान, 'शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही' ही शिक्षणविषयक भूमिका बाबासाहेब आंबेडकर यांची होती. हेच बाबासाहेब पुढे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. त्यांच्या शिक्षणाची पायाभरणी साताऱ्यातून झाली. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल आजही याची साक्ष देत आहे.