काँग्रेसला लोकांकडे जाऊन मत मागण्याचाही अधिकार नाही. काँग्रेसने इतक्या वर्षात काय केलं? काँग्रेसची इतक्या वर्षांची सत्ता आणि भाजपची दहा वर्षे बघा. काँग्रेसने जय जवान, जय किसान नारा दिला तो ऐकायला बरा वाटतो पण जवान आणि शेतकऱ्यांची प्रगती झाली का? फक्त घोषणा दिल्याने काय होतं? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचं काही भविष्य नसल्याचं उदयनराजे म्हणाले.
advertisement
विरोधकांकडे मुद्दाच नाही
देशात पुन्हा एकदा मोदी सरकार आल्यावर संविधान बदलण्यात येईल असा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो. या आरोपांनाही उदयनराजे यांनी उत्तर दिलं. उदयनराजे म्हणाले की, विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही त्यामुळे ते अशा गोष्टी बोलतात. पण मी लोकांना सांगेन की लोकशाही ही शिवाजी महाराजांनी दिलेली देणगी आहे आणि ती कोणी बदलू शकत नाही. संविधान बदलण्याची कोणती चर्चा झालेली नाही आणि विरोधकांकडून लोकांमध्ये भिती निर्माण केली जात आहे.
पवारांना एक स्वच्छ उमेदवार मिळाला नाही
उदयनराजे यांनी त्यांच्या विरोधात असलेल्या शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिल्यानं त्यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. मला शरद पवारांना विचारायचं आहे की पूर्ण साताऱ्यात तुमच्याकडे असा उमेदवार मिळाला नाही का की जो स्वच्छ असेल. ज्याच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, गुन्हा आहे अशा व्यक्तिला तिकिट दिलं. त्या उमेदवाराने साताऱ्यासाठी काय केलंय? इथं जे रस्ते झाले आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम झालंय ते सगळं भाजपने केलंय असं उदयनराजे म्हणाले.
जसं हॉलिवूड, बॉलिवूड तसं पॉलिटिक्स पॉलिवूड
उदयनराजेंची कॉलर उडवण्याची स्टाइल नेहमीच चर्चेत असते. त्यावरून विचारलेल्या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले की, जसं हॉलीवूड आहे, बॉलीवूड आहे तसं पॉलिटिक्स पॉलिवूड आहे. जेव्हा राजकारणात मी आलो तेव्हा मी कॉलर उडवली होती. मी आजपर्यंत कोणताही भ्रष्टाचार केला नाही, कोणाचे पैसे घेतले नाही म्हणून मी अभिमानाने कॉलर उडवतो. मला नव्हतं माहिती की लोकांना ही स्टाइल इतकी आवडेल आणि सोशल मीडियावर ही इतकी व्हायरल होईल.
