पुणे आणि बॉम्बे सॅपर्सशी जवळचे नाते: शहीद विकास गावडे हे पुण्यातील खडकी येथे मुख्यालय असलेल्या बॉम्बे सॅपर्सच्या ११५ इंजिनिअर रेजिमेंटचे जवान होते. त्यांचे मूळ गाव बरड (जि. सातारा) हे पुण्यापासून अवघ्या १२० किलोमीटरवर आहे. पुण्यातील लष्करी वर्तुळात आणि बॉम्बे सॅपर्सच्या जवानांमध्ये विकास यांच्या बलिदानामुळे शोककळा पसरली आहे.
कुटुंबाचा एकमेव आधार हरपला: विकास हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगी, आई-वडील आणि धाकटा भाऊ असा परिवार आहे. शहीद विकास यांची दोन वर्षांची मुलगी श्रीशाचा वाढदिवस दोन दिवसांवर आला होता. तसेच शांतीसेनेची मोहीम संपवून लवकरच ते मायदेशी परतणार होते आणि 14 जानेवारीला आपल्या घरी येणार होते, मात्र त्या आधीच त्यांना हौतात्म्य आलं.
advertisement
त्यांचे पार्थिव ११ जानेवारी रोजी सुदानमधून विमानाने मुंबईत आणण्यात आले आणि तिथून रस्तेमार्गे त्यांच्या गावी नेण्यात आले. दोन वर्षांची चिमुरडी श्रीशा आपल्या पित्याला पाणी पाजतानाचा क्षण काळजात चर्रर्र करून गेला.
"देशाच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी विकास यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली," अशा भावना सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश हांगे यांनी व्यक्त केल्या. अंत्यसंस्कारावेळी पुणे आणि साताऱ्यातील हजारो नागरिकांनी 'अमर रहे'च्या घोषणा देत या वीरपुत्राला श्रद्धांजली वाहिली.
