शरद पवार यांचा खास मर्जीतला माणूस म्हणून रामराजे निंबाळकर हे सातारा जिल्ह्याचं राजकारण हाताळणारे नेते म्हणून ओळखले जायचे. मात्र अजित पवारांसोबत गेल्यानं रामराजेंच्या कार्यकर्त्यांची जास्त कुचंबना झाल्याची भावना त्यांनी नुकतीच बोलून दाखवली. त्यामुळं रामराजे आता अजितदादांचा पक्ष सोडतील अशी शक्यता आहे. रामराजेंनी जर शरद पवारांची साथ दिली तर फलटण, वाई, कोरेगाव आणि माण या मतदारसंघांवर थेट परिणाम होऊन महायुतीला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
advertisement
रामराजेंच्या संभाव्य निर्णयाने फलटण मतदारसंघात चांगलेच वातावरण तापू लागले आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या मेळाव्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली होती. उंच असल्याने मेंदूपर्यंत रक्त जात नसल्याची आणि त्यामुळे ते पिसळल्यासारखे वागतायत, अशी बोचरी टीका रामराजे यांनी केली होती.
या टीकेला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उत्तर दिले. रामराजेंना कंबरेच्या खाली बोलायची सवय लागलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की ते तुतारीच्या मागे जाणार आहेत. आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा लाभ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा घेतलेला आहे. तुतारीकडे जाताना कोणावर तरी ठपका ठेवायचा. म्हणून माझ्याकडे बोट दाखवलं जातंय. सातत्याने सत्तेत राहण्याचा रामराजेंचा प्रयत्न असतो, असं प्रत्युत्तर रणजितसिंह निंबाळकरांनी रामराजेंना दिलं.
माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी देखील रामराजे नाईक निंबाळकर यांचा समाचार घेतला आहे. 20 वर्ष मंत्री, 7 वर्ष सभापती, 27 वर्ष सत्तेत असणारे रामराजेंना जयकुमार गोरे यांच्या नावाने रडण्याची वेळ आली. सत्तेशिवाय पाच महिने देखील रामराजे बाहेर राहिलेले नाहीत. त्यांना सत्ता गेल्याचे आता जाणवत आहे. जयकुमार गोरे यांनी केलेली लढाई ही सत्ता नसताना, आमदार नसताना, कोणतेही मंत्रिपद किंवा सभापतीपद नसताना केलेली आहे. तरी देखील जयकुमार गोरे कधीही सतरा वर्षात रडलेला नाही. पाच महिने सुद्धा ते आमचा सामना करू शकत नाही. याचाच अर्थ रामराजे किती कमजोर आहेत हे पहा, सत्तेची कवच कुंडले निघाल्यानंतर मला रामराजेंची दया येते. परमेश्वराने रामराजेंना या दुःखातून सावरण्याची ताकद द्यावी, असे खोचक प्रत्युत्तर गोरे यांनी रामराजेंना दिले.
