राजराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे आणि रघुवीरराजे नाईक निंबाळकर तसेच फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकून शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली. या पक्षप्रवेशाला स्वत: शरद पवार, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार अमोल कोल्हे आदी नेते उपस्थित होते.
advertisement
यावेळी केलेल्या भाषणात शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राचे विद्यमान सरकार निवडणुकीच्या तोंडावर नवनवीन घोषणा करीत आहे. सरकारने लाडकी बहीण योजना आणली. प्रत्येकाला बहिणीबद्दल आस्था असतेच. बहिणीचा सन्मानाचा सर्वांनाच आनंद होतो. विद्यमान सरकारला अडीच वर्षांत बहीण आठवली नाही. आधी पाच वर्ष देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार होते तेव्हा बहीण दिसली नाही. पण लोकसभेला ४८ पैकी ३१ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या की यांना बहीण आठवली, अशी फटकेबाजी शरद पवार यांनी केली.
बारामतीत यांनी सुप्रियाच्या विरोधात उमेदवार दिला. बारामतीकर खूप हुशार आहे. तिथं बहिण उभी राहिली. प्रचाराला गेलो की लोक बोलायचे नाहीत. गप्प बसायचे...पण निवडणूक झाल्यावर कळले की, लोक राजकारण्यांपेक्षा शहाणे आहेत, असे पवार म्हणाले.
फलटण आणि बारामतीत काही फरक आहे का? आज बारामतीचे चित्र वेगळं दिसते. पलीकडच्या बाजूला मालोजीराव नाईक निंबाळकर यांनी कारखानदारीचा पाया रचला. त्यावेळी काही काम असेल की आम्ही फलटणला यायचो. हा ऋणानुबंध दोन्ही बाजूंनी पाळला गेला, असे आवर्जून पवार यांनी सांगितले.
