महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांकरिता १६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. भारतीय जनता पक्ष ४ जागा, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना १ जागा आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एक जागा लढेल, असे सांगितले जाते. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे असलेले संख्याबळ पाहता एक जागा निवडून येऊ शकते. अशा परिस्थितीत आघाडीत कोण जागा लढणार, यावरून दावे प्रतिदावे सुरू आहेत. संजय राऊत हे शरद पवार यांचे नाव पुढे करीत असताना राज्यसभेची जागा शिवसेना पक्ष लढवेल, असे आदित्य ठाकरे म्हणाल्याने शिवसेना पक्षात पडद्यामागे नावांवर चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
advertisement
काँग्रेस राज्यसभेच्या जागेसाठी प्रयत्नशील?
काँग्रेस पक्ष राज्यसभेच्या जागेसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. एका लग्नाची पत्रिका देण्यासाठी सतेज पाटील हे मातोश्रीवर गेले. परंतु यानिमित्ताने राज्यसभेच्या जागेसंदर्भात त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती आहे. आघाडीतील संख्याबळ, संभाव्य उमेदवार आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आघाडीत शिवसेनेकडे जास्त आमदार, मातोश्री चर्चेच्या केंद्रस्थानी
तर दुसरीकडे जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्याकडूनही उद्धव ठाकरेंची वेळ मागण्यात आली आहे. शिवसेना पक्षाकडे जास्त जागा असल्याने राज्यसभेच्या जागेसाठी मातोश्री चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
शिवसेनेची भूमिका काय?
शरद पवार यांनी राज्यसभेवर जाणार नाही, अशी भूमिका जर घेतली तर आघाडीकडून कोणत्या पक्षाचा सदस्य राज्यसभेवर जाणार, याची चर्चा तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये होईल. आघाडीतील मोठा भाऊ म्हणून साहजिक उद्धव ठाकरे यांच्या सेनेला पहिल्यांदा संधी मिळू शकते. त्यानंतर प्रस्थापित नेत्यांपैकी एकाचे पुनर्वसन करायचे की नव्या चेहऱ्याला संधी द्यायची, याचा निर्णय ठाकरे घेतील.
कोण कोण निवृत्त होणार आहेत?
मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भागवत कराड, फौजिया खान, प्रियांका चतुर्वेदी, रजनी पाटील, धैर्यशील पाटील या सदस्यांची राज्यसभेची मुदत संपुष्टात येत आहे. सध्याच्या विधानसभेतील संख्याबळानुसार यापैकी सहा जागांवर महायुतीचे सदस्य बिनविरोध निवडून जाऊ शकतात. तर आघाडीचा एक सदस्य निवडून जाऊ शकतो.
