साताऱ्याच्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपचे नेते अतुल भोसले यांच्यात लढत होत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराला सतेज पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी बंटी पाटील यांनी जोरदार फटकेबाजी करून महाराष्ट्राच्या राजकारणात पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाचा दबदबा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
पृथ्वीराज चव्हाण नाम ही काफी हैं...!
advertisement
सतेज पाटील म्हणाले, महाविकास आघाडीला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. नेतृत्व करण्यात पृथ्वीराज चव्हाण यांचा सिंहाचा वाटा असणार आहे. एवढा मोठा माणूस तुम्हाला मिळाला आहे. पृथ्वीराज चव्हाण नाम ही काफी हैं...! कुठेही जावा, पृथ्वीराज बाबांच्या गावातून आलोय म्हटलं की काम होतंय, कुठेही अडचण येत नाही. एवढे वजनदार नाव पृथ्वीबाबांचं आहे, आता त्या नावाला साजेशे मताधिक्य मिळवून देणे ही आपली जबाबदारी असल्याचे सतेज पाटील म्हणाले.
विरोधकांच्या बाजूने पैशाचा महापूर येईल पण बळी पडू नका, पृथ्वीराजबाबा येणारच!
विरोधी पक्षाकडून काही अप्रचार होईल, काही टीका टिप्पणी होतील त्याकडे दुर्लक्ष करा, अशा सूचना करतानाच विरोधकांकडून पैशाचा महापूर येईल, परंतु काळजी करायचं काम नाही, पलीकडून पैशांचा महापूर असेल पण आपल्या बाजूला मतांचा महापौर येईल, महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडी सरकारची वाट बघत आहे, असे सतेज पाटील म्हणाले.