भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी ठाण्यातील भाजप नेत्यांची बैठक पार पडली. भाजप विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, सरचिटणीस माधवी नाईक आणि जिल्हाध्यक्ष संदिप लेले या कोअर कमिटी सदस्यांसोबत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची बैठक पार पडली.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जागावाटपाबाबतची भूमिका अधिक आक्रमक होताना दिसत आहे. ठाणे भाजपाचे निवडणूक प्रभारी निरंजन डावखरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीत भाजपने जास्तीत जास्त जागा लढवाव्यात, अशी भूमिका मांडली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे भाजपा कोअर कमिटीने सांगितले की, गेल्या नऊ वर्षांत ठाण्याच्या राजकीय परिस्थितीत मोठे बदल झाले आहेत. ही निवडणूक पूर्णपणे कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना नाराज करून चालणार नाही, कार्यकर्त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे… लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशामागे कार्यकर्त्यांचे कष्ट कारणीभूत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याच पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपने जास्तीत जास्त जागांवर दावा करावा, अशी मागणी निरंजन डावखरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, या बैठकीत ठाणे महापालिका निवडणुकीतील रणनीती, जागावाटप आणि संघटनात्मक तयारीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर ठाण्यातील भाजपची भूमिका अधिक ठोस झाल्याचे चित्र आहे. आता महायुतीतील जागावाटप चर्चांमध्ये भाजपकडून आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
