शाहिद राजमोहम्मद शेख असं हत्या झालेल्या २२ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो चांदा येथील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी रविवारी (११ जानेवारी) मयत शाहिद हा आपल्या काही मित्रांसह चांदा शनिशिंगणापूर रस्त्यावरील शेख वस्ती परिसरात गेला होता. इथं शाहिद शेखच्या नातेवाईकांचा कंदुरीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमानिमित्त मटणावर ताव मारण्यासाठी सर्व मित्रमंडळी जमली होती.
advertisement
दरम्यान, रविवारी सायंकाळच्या सुमारास एका किरकोळ कारणावरून शाहिद आणि मित्रांमध्ये शाब्दिक वाद झाला. पाहता-पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि क्षणातच एकाने पिस्तूल काढून शाहिदवर गोळ्या झाडल्या. अगदी जवळून गोळीबार केल्याने शाहिद रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार घडताच परिसरात खळबळ उडाली. काही स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि शेवगाव उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत मारेकरी निसटले होते. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. गोळीबार नक्की कुणी केला? वादाचं नेमकं कारण काय? याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.
